TOD Marathi

टिओडी मराठी, रायपूर, दि. 18 जून 2021 – योगगुरू रामदेव बाबा यांच्या विरोधात आता छत्तीसगढ पोलिसांनी ॲलोपथीविषयी खोटी माहिती पसरवत आहेत, या आरोपावरून गुन्हा दाखल केलाय. त्यासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) छत्तीसगढ शाखेने तक्रार नोंदवली होती. रामदेव बाबा यांच्यावर हे सरकार कारवाई का करत नाही?, अशाप्रकारे लोकांची दिशाभूल तर केली जात नाही ना? असा प्रश्न यावरून सामान्यांना पडत आहे.

रामदेव बाबा यांचे काही व्हिडिओ मागील काळामध्ये सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. त्यात ते ॲलोपथीविषयी प्रतिकूल टिप्पणी करताना आढळले. त्यावरून देशभरातील डॉक्‍टरांमध्ये नाराजी पसरली. त्यातून काहीकाळ रामदेव बाबा यांच्या विरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) असे चित्र निर्माण झाले.

त्यानंतर रामदेव बाबांनी सौम्य भूमिका स्वीकारत ॲलोपथीची प्रशंसा केली. तसेच, चांगल्या डॉक्‍टरांचा उल्लेख पृथ्वीवरील देवदूत म्हणून केला. मात्र, आयएमएच्या तक्रारीवरून छत्तीसगढमध्ये गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण अद्याप संपले नाही, असे मानले जात आहे. आयएमए ही देशातील डॉक्‍टरांची प्रमुख संघटना आहे.

रामदेव बाबा यांचा एका व्हायरल व्हिडिओत करोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. करोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.

त्यांच्या या विधानामुळे करोना काळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आता रामदेव बाबांनी माघार घेत कोरोना लस घेणार आहे, असं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या इतर अ‍ॅलोपॅथीसह केलेल्या व्यक्तव्यावर लोकांनी किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न निर्माण झालाय.