TOD Marathi

मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने महाराष्ट्रात बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. सत्तेसाठी स्थापन झालेला हा प्रयोग आता इतर राज्यातही करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग आता शिवसेना गोवा, उत्तर प्रदेशातही करणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

‘गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात २० ते २१ जागा लढवणार आहोत. तसेच उत्तर प्रदेशातही आम्ही ८० ते १०० जागा लढवू. तसेच गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करू शकतो. गोव्याच्या आघाडीत योग्य स्थान मिळालं तर आम्ही आघाडीत जाऊ शकतो’, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

उत्तर प्रदेशातही काही शेतकरी संघटना आहेत. या संघटना आमच्या सोबत यायला तयार आहेत. खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातही आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असं राऊत यांनी सांगितले. मात्र, गोवा आणि उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटे लढू, असंही राऊत म्हणाले आहेत.