TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 19 मे 2021 – महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या येत्या 2 जून 2021 पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान होणार आहेत , अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिलीय.

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ.अजित पाठक यांच्यासह आज मंत्रालयामध्ये झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

या परीक्षांत एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस., बी.पी.टी.एच., बी.ओ. टी.एच. आणि बीएससी. नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबत मॉडर्न मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे.