टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर खरेदीचा करार नुकताच पूर्ण केला. आणि त्यानंतर ट्विटरचा मालकी हक्क हा मस्क यांच्याकडे आला आहे. कंपनीची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचादेखील समावेश आहे. (Elon Musk takes control of Twitter)
ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असून ट्विटरच्या सुमारे साडेसात हजार कर्मचाऱ्यांपुढे मोठं संकट ओढवणार असल्याचे दिसतंय. एलॉन मस्क यांनी १३ एप्रिल रोजी ट्विटर खरेदी करण्याची घोषणा केली होती. ४४ अरब डॉलरमध्ये ट्विटर खरेदी करण्याची ऑफर त्यांनी दिली होती. मात्र, स्पॅम आणि फेक अकाउंटसच्या माहितीमुळे ही डील पुढे जाऊ शकली नाही.
पुढे ८ जुलैला मस्क यांनी खरेदी प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं हे प्रकरण डेल्वेअर चान्सरी न्यायालयापर्यंत पोहोचले होते. मात्र, पुन्हा ऑक्टोबरमध्ये मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा विचार निश्चित केला.
CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी का?
ट्विटरवर फेक अकाउंटच्या संख्येबद्दल गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप एलॉन मस्क यांनी केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांचा ट्विटरसोबतचा करार पूर्ण झाला तेव्हा अग्रवाल आणि सेगल हे अधिकारी ऑफिसमध्ये उपस्थित होते. यानंतर त्यांना कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, याबाबत ट्विटर, एलॉन मस्क किंवा संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याकडून अधिकृत वक्तव्य आलं नाही.