TOD Marathi

मुंबई : राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसला. त्यानंतर संपूर्ण सरकारलाच धक्का बसला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे सरकार कोसळलं. (MVA govt collapsed after rebel of Ekanath Shinde) या निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं होतं याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत दिली. भाषण करता करता शिंदे एकदम सुस्साट सुटले. त्यांनी एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले. ते ऐकून त्यांच्या बाजूला बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरश: हात जोडले. (DCM Devendra Fadnavis) आणि सगळं उघड करू नका, अशी विनंतीच त्यांनी शिंदेंना केली. यावेळी सभागृहात एकच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.

सगळं घडवणारे देवेंद्र फडणवीस आहेत. कधी काय करतील कळत नाही. सगळी फिल्डिंग लावून त्यांनी राज्यसभेचे उमेदवार पडले. त्यावेळी काँग्रेसनं ४४ मतं घेतली, राष्ट्रवादी काँग्रेसनं ४३ मतांचा कोटा घेतला. आमचा उमेदवार निवडून येईल असं वाटत होतं. पण आमचा उमेदवारच पडला. फडणवीसांनी आमचा उमेदवार पाडला, असा किस्सा शिंदे यांनी सांगितला. शिंदेंचा किस्सा ऐकून सभागृहात एकच हशा पिकला. फडणवीस खळखळून हसले. त्यांनी हात जोडले आणि सगळं उघड करू नका, अशी विनंती शिंदेंना केली.

राज्यसभा निवडणुकीतील आमचे दुसरे उमेदवार संजय पवार यांच्यासाठी मी तीन मतं बाहेरुन आणली होती. सगळ्यांनी ते पाहिलं. राज्यसभेनंतर विधानपरिषद निवडणूक होती. शिवसेनेचे दोन निवडून आणण्यासाठी तयारी केली. दोन्ही उमेदवार निवडून आले, असा घटनाक्रम शिंदेंनी सांगितला.

विधानपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर मी जाताना सगळी तयारी केली. आम्ही सूरतच्या दिशेनं सुस्साट निघालो. माझं लोकेशन काढून नाकाबंदी केली गेली. पण नाकाबंदीतून कसं निघायचं हे मलाही कळतं, असं शिंदे यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. आम्ही जे काही केलं,‪‪‪‪‪‪‪ त्यामागे एक विचार आहे. तो हिंदुत्वाचा आहे, असंही शिंदे म्हणाले.