शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) हे आता वेगळा गट करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या गटाने “शिवसेना- बाळासाहेब ठाकरे” असं नाव ठरवल्याची माहिती आहे. या संदर्भातली अधिकृत घोषणा आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे गटाकडून होण्याची शक्यता आहे. (Shivsena – Balasaheb Thackeray)
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (Shivsena National Executive Meeting) आज होत आहे.या बैठकीत महत्त्वाच्या घोषणा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी होईल, अशीही मोठी शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्या गटाचं नामकरण “शिवसेना- बाळासाहेब ठाकरे” असं करण्यात आलं आहे. मात्र यावर शिवसेनेचे नेते जे आज राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला हजर होत आहेत त्यांनी आक्षेप नोंदवत एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीसाठी शिवसेना नेते शिवसेना भवनात दाखल होत आहेत आज दोन्ही बाजूंनी महत्त्वाचे निर्णय होतील अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.