TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 22 मे 2021 – शहरातील एमआयटी कॉलेजमध्ये तृतीय वर्षात एमबीबीएस शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. डॉ. राहुल विश्वनाथ पवार असे या 25 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. त्यांनी कर्ज काढून मुलावर उपचार करत आहेत. याची दखल मंत्री अमित देशमुख यांनी घेतली आहे. त्यांनी तातडीने संबंधित डॉक्टर, अधिकारी आदींशी संपर्क साधून योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच राहुलच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. राहुल विश्वनाथ पवार हा परभणी जिल्ह्यातील मौजे लिंबा (ता.पाथरी) गावचा आहे. शिकून डॉक्टर व्हायचे, हे स्वप्न उराशी बाळगून परिस्थितीशी सामना करत पहिल्यांदा या गावातून तो एकटाच डॉक्टर होत आहे. लातूरच्या एमआयटी महाविद्यालयात एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षाही त्याने दिली. पण, त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

राहुल पवार याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आई-वडील आणि छोटा भाऊ असा त्याचा परिवार असून त्याचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत. छोटा भाऊ सचिन दहावीत शिकत आहे. तोही आई-वडिलांना ऊस तोडण्याच्या कामांत मदत करतो. त्यांच्या पाठिंब्यावर डॉ. राहुलने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करुन रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न पाहिले आहे.

1 मे 2021 पासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू-
‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’ या युनिव्हर्सिटीची एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा गतवर्षी एप्रिल महिन्यात झाली. मार्च दरम्यान लेखी परीक्षा तर १६ ते २३ मार्च दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा झाली. या दोन्ही परीक्षा राहुलने पुर्ण तयारी दिल्यात. पण, कोरोनाची लक्षणे असतानाही परीक्षा नाही दिल्यास सहा महिने बॅक राहतात. त्यामध्ये परिस्थिती हालाखीची असल्याने हे परवडणारे नव्हते. म्हणून राहुलनेही परिक्षेला प्राधान्य दिले. परीक्षा झाल्यानंतर राहुलला कोरोना झाला. त्यामुळे त्याला १ मेपासून औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे.

दवाखान्याचा खर्च अफाट :
दिवसेंदिवस राहुलची प्रकृती गंभीर होतेय. सध्या त्याला कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय. दवाखान्याचा खर्च लाखोंच्या पटीत असून घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. रुग्णालयात तो मृत्यूशी झुंज देत या संकटाला ‘परीक्षा पद्धती’ की ‘राहुलची परिस्थिती’ जबाबदार ? असा उद्विग्न करणारा सवाल राहुलचा मित्र डॉ. मयुर कावरके याने प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय. राहुलच्या उपचारासाठी मदत करण्याचे त्याने आवाहन केले आहे.

मंत्री अमित देशमुख यांनी घेतली दखल : वैदयकीय शिक्षण विभागाला निर्देश
मंत्री अमित देशमुख यांनी याबाबत दखल घेऊन डॉ. राहूल पवार यांच्या प्रकृती विषयी चौकशी करुन आवश्यक ती सर्व मदत करण्याचे वैदयकीय शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर लिहलं आहे, (ते पुढीलप्रमाणे:)

औरंगाबाद येथील एमजीएम रूग्णालयात उपचार घेत असलेले इंटर्न डॉ. राहूल पवार यांच्या प्रकृती विषयी तसेच त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारासंबंधी आज शुक्रवारी, (दि. 21 मे) माहिती करून घेतली. या उपचाराच्या संदर्भाने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल असे एमजीएम रूग्णालय प्रशासनाला सांगितले आहेत. तसे निर्देशही वैदयकीय शिक्षण विभागाला दिलेत.

डॉ. राहूल पवार यांचे एमआयएमएसआर या लातूर येथील खाजगी वैदयकीय महाविदयालयात शिक्षण पूर्ण झाले असून तेथेच ते इंटर्नशीप करीत आहेत. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. उपचारादरम्यान म्युकरमाईकोसीस या आजाराचाही संसर्ग झालाय. सध्या औरंगाबाद येथे एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. राहूल पवार यांच्यावरील उपचार आणि त्यांच्या आई-वडिलांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आज वृतपत्रातून माहिती प्रसिध्द झालीय. त्याची तातडीने दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातून एमजीएम रूग्णालयाशी संपर्क साधला. डॉ. राहूल यांची प्रकृती तसेच त्यांच्यावरील उपचाराविषयी माहिती घेतली.

एमआयएमएसआर वैदयकीय महाविदयालय, एमजीएम रूग्णालय तसेच इतर काही मंडळी डॉ. राहूल पवार यांच्यावरील उपचारासाठी मदत करीत आहे. मी हि वैदयकीय शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहाने, सहसंचालक डॉ.चंदनवाले यांना एमजीएम रूग्णालयाच्या संपर्कात राहून डॉ. राहूल पवार यांच्यावरील उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासह डॉ. राहूल पवार यांची प्रकृती लवकर सुधारेल आणि ते लवकर वैदयकीय सेवेत रूजू होतील, अशी भावना व्यक्त करतो.

मदतीचे आवाहन :
डॉ. राहुल पवार यांना आपणही मदत करु शकता.
Phonepe/GooglePay:
8668229432 श्रीकांत चव्हाण,

डॉ. राहुल पवार यांना आपणही मदत करु शकता.
डॉ राहुल विश्वनाथ पवार,
स्टेट बँक ऑफ इंडिया,
शाखा पाथरी .
खाते क्र. 35075282295
IFSC CODE:- SBIN0003801