TOD Marathi

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) दुरुस्तीचं काम सध्या सुरु आहे. त्यामुळे या महामार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाऊ नये, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. महामार्गावर सुरु असलेल्या वाहतूक कोंडीमुळे टोल न घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या महामार्गावरील येथे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमृतांजन पुलाजवळ एक ते दीड किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सलग सुट्ट्या, वीकेंड आणि गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांची गर्दी महामार्गावर पाहायला मिळत आहे.

येत्या बुधवारी 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी असून घराघरांत लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यापूर्वीच्या विकेंडला अनेक चाकरमान्यांनी आपापल्या गावाकडची वाट धरली आहे. त्यामुळे मुंबई बाहेर जाण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

शुक्रवारीही मुंबई-पुणे महामार्गावर किवळे ते सोमटने या मार्गा दरम्यान दोन तासांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला होता. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉक दरम्यान एक्स्प्रेस वेवरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली होती. एक्स्प्रेस वेवर प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी  ITMS (इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम) प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणीसाठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.