मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना दिली आहे, असं वळसे पाटील म्हणाले. पवार कुटुंबापासून मला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्यात येणार आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “आम्ही नेहमीच शरद पवारांना भेटत असतो, अनेक गोष्टी त्यांच्या कानावर घालायच्या असतात, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं असतं, त्यानुसार ही भेट झाली.”
सदाभाऊ खोत हे सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी गुरुवारी (16 जून) संध्याकाळी एका हॉटेलचालकाने त्यांना अडवून, अनेक महिन्यांपासून जेवणाचे बिल रखडल्याचा आरोप केला होता. मात्र सदाभाऊ खोत यांनी हे आरोप फेटाळले होते. त्यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची चाल असल्याचा आरोप केला होता. टोमॅटोसारख्या गालाचा राष्ट्रवादीचा नेता यामागे होता. तसंच राष्ट्रवादी पक्षापासून विशेषत: पवार कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका आहे असा आरोपही केला होता.
पवार कुटुंबापासून आम्हाला धोका आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “मला वाटत नाही की सदाभाऊंच्या जीविताला धोका आहे. तरीसुद्धा त्यांनी जी भीती व्यक्त केली आहे, त्यांचं जीवन सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मी आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवावी.”