TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 27 ऑगस्ट 2021 – जपानमधील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राचे नाव पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या मैदानाला दिले आहे. या समारंभाचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. या स्टेडियमला ‘नीरज चोप्रा स्टेडियम आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ असे नाव दिले आहे. यावेळी लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे हे उपस्थित होते.

नीरजने पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संरक्षण दलांनी कौतुकाचा वर्षाव केला. देशातील प्रत्येकाला नीरजच्या कामगिरीचा अभिमान आहे. तो एका खऱ्या सैनिकासारखा लढल्याचे संरक्षण दलांनी म्हटले होते. नीरजला १५ मे २०१६ पासून ४ राजपूताना रायफल्सच्या तुकडीमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त केले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकत १२१ वर्षांचा दुष्काळ संपवला. भारताला अ‍ॅथलेटिक्स प्रकारात पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळाले असून नीरजने अंतिम फेरीत ८७.५८ मीटर लांब भाला फेकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तर दुसरीकडे भारताला १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळाले.