TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर दि. 5 ऑगस्ट 2021 – लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांच्या खासदार स्थानिक विकासनिधीतून लोहा- कंधार मतदारसंघामध्ये चार रुग्णवाहिका रुग्ण सेवेत दाखल झाल्या आहेत. आज एका रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद तथा भाजप जिल्हा सरचिटणीस प्रविण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या प्रणिता देवरे, लोहाचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, किरण सावकार वट्टमवार, लोहा भाजप तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, कंधार उपनगराध्यक्ष जफरोद्दीन महमद, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

लोहा-कंधार वासियांच्या सेवेत रुग्णवाहिका अर्पण व्हावी, हीच खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांची सदिच्छा होती. सध्या संसदेचे अधिवेशन दिल्लीत सुरु असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या आहेत. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवेचे व्रत अंखडीतपणे सुरु राहील, अशी सदिच्छा देखील व्यक्त केली आहे.

लोहा-कंधार मतदारसंघाच्या विकासासाठी नांदेडचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासोबत भविष्यात अनेक विकासकामांना गती मिळेल. तसेच लोहा-कंधार या दुर्मिळ भागामध्ये विकासाचे कामे पूर्णपणे होण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार आहे. हि रुग्णवाहिका अनेक रुग्णांच्या सेवेत कामी येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या नव्या रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक मजबूत आणि बळकट होणार आहे. लोहा-कंधार मतदारसंघामध्ये रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवा घडत राहो, अशी अपेक्षा खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी शुभेच्छा संदेशाव्दारे व्यक्त केलीय.