TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 27 ऑगस्ट 2021 – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर रखडलेल्या मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. येत्या 2 सप्टेंबर रोजी ही भेट होणार असून याबाबत संभाजी छत्रपती यांनी ट्‌विट करून तशी माहिती दिलीय. यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविताना राष्ट्रपती आणि केंद्र सरकार यांची देखील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, असे संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना मराठा आरक्षण प्रश्‍नी मराठा समाजाच्या भावना समजावून सांगण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार त्यांनी 2 सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिलीय.

यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी 1 खासदार प्रतिनिधींने उपस्थित राहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आरक्षणाबाबत तातडीने पाऊले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवण्याची गरज आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. याबाबत सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींसमोर आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. त्यासंदर्भात ते काय सल्ला देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.