दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून “इरगाल”ने पटकावला बेस्ट फिल्म ज्युरी अवॉर्ड

दिल्लीत झालेल्या बाराव्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात (Dadasaheb Phalke Film Festival) रशीद उस्मान निंबाळकर (Rashid Usman Nimbalkar) दिग्दर्शित ‘इरगाल’ (Irgal) चित्रपट बेस्ट फिल्म ज्युरी अ‍वॉर्डचा मानकरी ठरला. महोत्सवातील ७१८ चित्रपटांतून “इरगाल” चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला असून, महाराष्ट्रातील मरिआई (Mariai) या दुर्लक्षित जमातीवर हा चित्रपट बेतला आहे. आता लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) प्रदर्शित होणार आहे.

मरिआई ही दुर्लक्षित जमात आहे. धर्मग्रंथात किंवा वाङ्मयात त्या बाबत उल्लेख आढळत नाही. डोक्यावर मरिआईचा गाडा, गळ्यात ढोलकं आणि चाबूक घेऊन हा समाज ऋतूप्रमाणे वर्षातील आठ महिने पोटासाठी भटकंती करत असतो. भटकंती दरम्यान कुठे ही मुले जन्माला येतात, तर काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो. मात्र अज्ञान व शिक्षणाच्या अभावामुळे मरीआई जमातीच्या जन्म-मृत्यूची नोंद शासनदप्तरी होत नाही. आज समाज जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, रेशन कार्ड आधार कार्ड साठी झगडताना दिसतो. मरिआई हा समाज अंधश्रद्धेच्या जोखडात बांधला गेला‌. समाजातील बोटावर मोजण्याइतपत तरुण मुलं शिक्षणाकडे वळल्यामुळे त्यांच्यात थोडीफार जागृती झाली आहे. मात्र शिक्षणामुळे या समाजाचा अंधकारमय जीवनात प्रकाश किरण येऊ शकते असा संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक रशीद निंबाळकर स्वतः मरिआई समाजाचा एक घटक आहेत. अंधश्रद्धा आणि जाचक रूढी परंपरामुळे अनेक जाती जमाती विकासापासून कोसो मैल दुर आहेत. मरिआई हा त्यापैकी एक समाज आहे. मरिआई समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी “इरगाल” हा चित्रपट केल्याचं रशीद निंबाळकर यांनी सांगितलं.

Please follow and like us: