TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 मे 2021 – मुंबईवर दोन दिवसांपासून तौक्ते चक्रिवादळाचे संकट घोंघावत असून काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहत होते. यातच पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. मुंबईला चक्रिवादळाचा फटका बसला असून आज सकाळी मुंबईमध्ये अवघ्या दोन तासात 132 झाडे उन्मळून पडली. तर, वाहतुकीचा सी-लिंक बंद करण्यात आला आहे.

मुंबईत कालपासून जोराचे वारे वाहत असून पाऊस देखील जोरात पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे काल 16 मे रोजी मुंबईत 50 झाडे उन्मळून पडली आहेत . तर, आज सकाळी 8 ते 10 या दोन तासात एकूण 132 झाडे कोसळून पडली. त्यामध्ये शहरात 59, पूर्व उपनगर 15 आणि पश्चिम उपनगरातील 58 झाडांचा समावेश आहे.

सुदैवाने झाड कोसळल्याने कोणतीही जिवीत तसेच वित्तहानी झालेली नाही, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट सांगितलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलवर आज एका झाडाची फांदी कोसळली. ओव्हरहेड वायरवर ही फांदी कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने धूर निघाला. त्यामुळे लोकल तात्काळ थांबवावी.

यामुळे रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या घटनेमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नसून रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड हटवलं आहे.