टिओडी मराठी, दि. 15 मे 2021 – भारतासह जपानमध्ये देखील कोरोनाची आणखी एक लाट आली आहे. जपानच्या काही शहरांत 31 मेपर्यंत आणीबाणीही लागू केली आहे. यामुळे 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केलेल्या टोकियो ऑलिम्पिकवरील संकट वाढले आहे.
देशातील 3 लाख 50 हजारांच्यावर जनतेच्या सह्या घेऊन टोकियो ऑलिम्पिक आयोजनाच्या विरोधात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे आता टोकियो ऑलिम्पिक रद्द होणार की काही दिवस पुढे ढकलले जाईल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
जपानमधील टोकियो शहरात ऑलिम्पिकचे आयोजन केले आहे. पण, वाढत्या कोरोनामुळे टोकियोसह जपानमधील चार शहरांमध्ये मे महिन्याच्या अखेरीसपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. नॉर्थन होकेईदो या शहरातही आणीबाणी लागू केली आहे. याच शहरात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाचा फटका या संपूर्ण क्रीडा महोत्सवाला बसणार आहे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
वाढत्या कोरोनामुळे जपानवर देखील संकट कोसळले आहे. येथे कोरोनाची चौथी लाट येऊ नये, यासाठी नियोजनबद्ध योजना आखली जात आहे. त्यामुळे येथील जनतेने टोकियो ऑलिम्पिक आयोजनाच्या विरोधात याचिका दाखल केलीय. ही याचिका आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती, जपानमधील आयोजक आणि सरकार यांनाही पाठविली आहे. मेडिकल सुविधांचा अभाव असताना ऑलिम्पिकसारख्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणे योग्य ठरणार नाही, असे यात स्पष्ट केले आहे.
टोकियो ऑलिम्पिक आयोजनाला मात्र विविध खेळांच्या संघटकांकडून थम्स अप दाखविला आहे. कोरोनाला मागे टाकत आता पुढे जाणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम पाळून टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.