TOD Marathi

भंडारा: भंडारा जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीची निवडणूक आज पार पडलेली आहे. यामध्ये काँग्रेसचे गंगाधर जीभकाटे हे जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांचे कट्टर समर्थक संदीप ताले यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे.

सर्वच पक्षांनी आपापल्या सदस्यांना सुरक्षित ठेवून आज सकाळी भंडारा गाठलं. 21 सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे तर 13 सदस्यांसह दुसरा सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. भाजपचे 12 सदस्य आहेत तर शिवसेनेचा 1 सदस्य आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे, महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षरीने काही दिवसांपूर्वी एक पत्रही निघाले होते आणि त्या पत्रानुसार महाविकास आघाडीने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला असता तर सत्ता स्थापन करणे सहज शक्य होते मात्र काँग्रेसने भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासोबत असलेल्या भाजपच्या 6 सदस्यीय गटाला सोबत घेतल्याने काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला मात्र या बदल्यात भाजपच्या ‘त्या’ सहा सदस्यीय गटाला संदीप ताले यांच्या रूपाने उपाध्यक्ष पद द्यावे लागले आहे. भाजपला मात्र आपले सगळे सदस्य एकत्र ठेवण्यात सपशेल अपयश आले आहे.

भंडारा जिल्हा परिषदेत झालेली निवडणुक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, भाजपचे माजी मंत्री आमदार परिणय फुके, खा. सुनील मेंढे, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्यासाठी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची होती.

भंडाऱ्यात महाविकास आघाडी एकत्र येईल का? की अनपेक्षित युती समोर येईल? की काही नवी समीकरणे देखील या ठिकाणी उदयास येतील अशी चर्चा आधीपासून सर्वत्र होती. आज यावर अंतिम शिक्कामोर्तब होत काँग्रेसने भाजपच्या एका गटाची मदत घेत राष्ट्रवादीला आणि भाजपच्या दुसऱ्या गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे मात्र हे सगळं होत असताना काँग्रेसच्या गोटातही मोठया घडामोडी होत आहेत. भाजपच्या एका गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही दूर ठेवत काँग्रेसने जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली असली तरी शेवटी भाजपच्या सोबतच युती केली याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले काय बोलतात हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला मदत न केल्याचा वचपा ही काँग्रेसने काढला का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे.