TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 11 मे 2021 – कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण सुरू केलंय. पण, सध्या सर्वत्र लसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लोकांत संभ्रमाचं वातावरण आहे. पण, पुण्यात वेगळाच गोंधळ पहायला मिळतोय, पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ होत आहे, असे चित्र समोर येत आहे.

कोरोना लसीकरणासाठी पुण्यासाठी 8 वाजता ऑनलाईन नोंदणी सुरू होते. मात्र, पावणे आठच्या सुमारास लसीकरण केंद्रांवरील बुकिंग फुल्ल झाल्याचं दाखविलं जातंय. लसीच्या स्लॉट बुकिंगमध्ये वशिलेबाजी सुरू आहे, असा आरोप पुण्यातील सामान्य लोक करत आहेत. सामान्य लोक हातात मोबाईल घेऊन बुकिंगसाठी धडपड करताना आढळत आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

पुणे शहरात तरूण वर्गाची लोकसंख्या सुमारे 22 लाख एवढी आहे. राज्य सरकारकडून 10 दिवसांत केवळ 15 हजार लसींचे डोस आले आहेत. त्यातील 13 हजार जणांचे लसीकरण झालंय. त्यामुळे पुण्यात मंगळवारी केवळ दोन केंद्रावर लसीकरण सुरु आहे. त्यामुळे एवढ्या अधिक प्रमाणात लसीकरण करण्याचे आव्हान पुणे महापालिकेपुढे आहे.

या दरम्यान, स्लॉटसाठी लिंक ओपन करण्याचे सर्व अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत. शासनाचा यात काही संबंध नाही, असे कुटुंब नियोजन मंडळातर्फे सांगितले आहे. प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळामुळे सामान्य लोकांना अडचणीचा सामना करावा लागतोय.