TOD Marathi

मुंबईः

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of state assembly) सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवास, तसेच गोविंदा पथकांना दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास करता येईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde announcement) यांनी केली आहे. याशिवाय वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केली जाणारी वैद्यकीय विषयक उपकरणे व इतर आनुषंगिक खरेदी ही गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस या पोर्टलच्या माध्यमातून करावी, असे निर्देश दिले आहेत. गोविंदा पथकांना सरकारने विमा कवच द्यावा, अशी मागणी होती. यानुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता १० लाख रुपयांचे विमा संरक्षण सरकारकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचा प्रीमिअम सरकार भरील,’ असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

राज्यात सुपरमार्केटमध्ये वाइनविक्रीस परवानगी देणारा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करायचा की, कायम ठेवायचा याबाबत विचार सुरू आहे; परंतु, करोनाकाळात दारू, वाइन, बिअरच्या विक्रीवर परिणाम झाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उत्पन्न कमी झाले होते. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, असे राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई (Excise minister Shambhuraj Desai) यांनी मंगळवारी स्पष्ट केले. आढावा बैठकीत ते बोलत होते.