TOD Marathi

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकला असल्याची घोषणा यावेळी केली आहे. (Opposition Leader Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, कपिल पाटील, एमआयएमचे आमदार यांना बैठकीला बोलावलं होतं. त्या बैठकीत चर्चा करुन चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांना याबाबत एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये चहापानावरील बहिष्काराचं कारणंही दिलं आहे.

स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरा करत आहोत. (Azadi Ka Amrit Mahotsav) अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना विरोधी पक्षाकडून शुभेच्छा देतो. विरोधी पक्षांच्यावतीनं ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करतो, असं अजित पवार म्हणाले. विनायक मेटे यांचं अपघाती निधन (Vinayak Mete death) झालं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जम्मू काश्मीरमध्ये आयटीपीबीपीच्या जवानांच्या बसचा अपघात त्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन करतो, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे सरकार लोकशाही आणि संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवत स्थापन झालं आहे. विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेलं हे सरकार अद्यापही विधीमान्य नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत तारखा सुरु आहेत, निवडणूक आयोगात प्रकरण सुरु आहे. सुप्रीम कोर्टात याचा निवाडा झाला नाही, असं अजित पवार म्हणाले.

अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. (Monsoon Session) आम्ही त्यांना १७ ते २७ तारखेदरम्यान अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. पुढील वेळी विचार करु असंही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत एनडीआरएफच्या दुप्पट मदत केली, असं ते म्हणाले. आम्ही आमच्या सरकारच्या काळात तिप्पट मदत केली होती. शेतकऱ्यांना मदत ही निव्वळ धूळफेक आहे. १५ लाख हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मविआ सरकारच्या काळात नुकसान झालेल्यांना १५ हजार रुपये, ज्यांचं घर पडलं त्यांना भरीव मदत केली होती. या सरकारनं सामान्य माणसांना मदत करण्याची गरज होती ते देखील यांच्याकडून झालं नाही. ऑगस्ट महिना उजाडला तरी पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेलं नाही. निश्चित केलेल्या पीक कर्ज वाटपाच्या अर्धे देखील उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेलं नाही, असं देखील अजित पवार म्हणाले.