सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज सगळीकडे आगमन झाले आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात गणेशाचं स्वागत केलं जात आहे. बाप्पाच्या आगमनानं सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. सार्वजिक गणेशोत्सवांच्या गणपतींचे आगमन देखील झाले आहे. गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील लोक पुण्यात (Ganpati Festival Pune) दरवर्षी येत असतात. ढोल ताशाच्या गजरात गणपतीचं स्वागत केलं जातं आहे. अशातच पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.
रस्त्यावरील गर्दीमधून मार्ग काढत आज गणेश भक्त बाप्पाचं दर्शन घेत आहेत. अशातच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसांच्या मोटरसायकलवर मागे बसून प्रवास केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतलं. त्यानंतर भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी ते जाण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता त्यांना वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर बसून प्रवास केला. तसेच चंद्रकांत पाटील हे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या रथामध्ये देखील बसले होते.