TOD Marathi

अहमदनगर : 

जिल्ह्यातील दुर्गम भागात राहून देशी बियाणांचे संवर्धन करणाऱ्या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या मानलेल्या भावाला खास भेट दिली आहे. भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील (Cabinet Minister Chandrakant Patil) यांना खास देशी बियांणापासून बनवलेल्या राख्या भेट म्हणून पाठवल्या आहेत. अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांचे संवर्धन केलं आहे. त्यांचे संशोधन इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे यासाठी त्यांनी घरातच एका बीजबँक स्थापन केली. त्यांचे कार्य बायफ या संस्थेने जगासमोर आणले आणि तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहीबाईंच्या कामाची दखल घेतली. चंद्रकांत पाटील यांनी मार्च २०१९ मध्ये राहीबाई यांना नवीन आणि पक्की बीजबँक बांधून दिली. या बँकेच्या उद्घाटनाच्या दिवशी चंद्रकांत पाटलांनी राहीबाईंचा उल्लेख बहीण म्हणून केला. तेव्हापासून राहीबाई या चंद्रकांत पाटलांना आपला भाऊ मानतात.

राहीबाई यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. (Rahibai Popere) मात्र त्यांच्यातील भावा-बहिणीचा जिव्हाळा कमी झाला नसल्याचे उदाहरण या रक्षाबंधनानिमित्त बघायला मिळालं आहे.

भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यासारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या माध्यमातून राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतलं आहे. (Rahibai Popere made Seed Rakhi) त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्या आहेत. सुरेख दिसणाऱ्या या बीज राख्यांची निर्मिती करून, त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ व एकरूप आहोत हे दाखवून दिलं आहे.