TOD Marathi

पुणे : 
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) पुढच्या पाच वर्षांत निवृत्त होणार का, अशी कुजबूज आता सुरु झाली आहे. आणि याला कारण ठरलं पुण्यातील एसएनडीटी विद्यापीठात चंद्रकांत पाटील यांनी भाषणादरम्यान केलेलं एक वक्तव्य. पुढील शंभर वर्षांची दृष्टी आपल्याकडे नाही, आणि आपल्याला त्यात रसही नाही. कारण आपल्याला अजून ५-१० वर्ष काम करुन जायचंय, असं पाटील बोलण्याच्या ओघात म्हणाले. परंतु त्यावरुन चंद्रकांत पाटलांना निवृत्तीचे वेध लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

कुठलाही रिझल्ट घ्या समोर, त्यामध्ये ६०-७०-६५ टक्के आपल्याला महिला दिसतात, त्या खूप सिन्सिअरली आणि सँक्टिटी (sanctity) म्हणू शकतो… पावित्र्याने बघतात कुठल्याही गोष्टीकडे, याचीच जगाला आणि भारताला गरज आहे. सिन्सिअॅरिटीची पण आवश्यकता आहे आणि सँक्टिटीचीही. ती महिलांमध्ये पुढची १०० वर्ष तरी टिकेल, त्यानंतर कालचक्र फिरेल, त्यावेळेला कोण करेल माहिती नाही, मला त्याचं व्हिज्युअलायझेशनही नाही आणि इंटरेस्ट पण नाही, कारण आपल्याला अजून ५-१० वर्ष काम करुन जायचंय. त्यामुळे कालचक्रामध्ये १०० वर्ष आता महिला साम्राज्य करणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

याआधी, मी कोणतीच निवडणूक आजपर्यंत हरलेलो नाही. कोल्हापूरमधून आजही लढण्यास तयार आहे आणि तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात जाईन, असे आव्हानात्मक उद्गार नोव्हेंबर २०२० मध्ये काढल्याने चंद्रकांत पाटील चर्चेत आले होते. त्यावरुन अनेकदा विरोधक त्यांना आजही डिवचतात.

चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद आहे. फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्रालयासारखी मोठी जबाबदारी सांभाळलेल्या चंद्रकांत पाटील यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्रिपद सोपवले आहे. चंद्रकांत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरुनही पायउतार व्हावे लागले, आणि कॅबिनेटमध्येही तुलनेने कमी महत्त्वाचे मानले जाणारे खाते मिळाले, त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.