TOD Marathi

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर होणारे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले आहे. त्यामुळे आता नागरिकांना या महामार्गावरून वेगवान वाहतुकीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (Nagpur Mumbai Samruddhi Expressway)

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते सेलू बाजार हा २१० किलोमीटरचा सलग मार्ग आणि मालेगाव ते वैजापूर असा पुढील रस्ता सुरू करण्याचा विचार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू होता. हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र यासाठी राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही. तसेच येत्या दोन दिवसांत तयारी करून महामार्गाचे उद्घाटन करणे शक्य नसल्याची स्थिती आहे, अशी माहिती आहे त्यामुळे या महामार्गाचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर पडले आहे. (First phase Nagput to Shelubazar)

समृद्धी महामार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सृमद्धी महामार्गाच्या नागपूर ते वाशीम जिल्ह्यातील सेलू बाजार या २१० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील मार्ग २ मे रोजी सुरू करण्यात येणार होता, तशी घोषणाही ‘एमएसआरडीसी’ने केली होती. मात्र नागपूरपासून १५ किलोमीटरवर असलेल्या प्राण्यांचा ओव्हरपास कोसळल्याने हे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर गर्डर कोसळलेल्या ओव्हरपासचे काम पूर्ण करून महामार्गाचे उद्घाटन केले जाईल, असे सांगितले जात होते. तसेच पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १५ ऑगस्टला केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र आता १५ ऑगस्टचा मुहूर्तही हुकण्याची शक्यता आहे.