टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 ऑगस्ट 2021 – गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज मुंबई आणि नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रसह विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा पाऊस पडणार आहे.
राज्याच्या किनारपट्टीच्या भागात ढगांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी सक्रीय वातावरण निर्माण झालंय, असे हवामान विभागाने सांगितलं आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झालीय. पुण्यासह मराठवाडा आणि बाजूच्या परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी IMD कडे आल्यात. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही वर्तवली आहे.
मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यामुळे खरिपातील पिकांची वाढ खुंटली होती, तर हलक्या जमिनीतील पिकांनी माना टाकल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शेतीतील आंतरमशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.
पाऊस नसल्याने तो चिंतेत होता. मागील आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. आता पुढील काही दिवस पाऊस कोसळणार असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. हा पाऊस सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, बाजरी आणि मूग या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पश्चिम बंगाल, ओडिसा, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भामध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे.