TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 14 जून 2021 – महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत एका अतिउत्साही युवकाने यूटय़ूबवरचा व्हिडीओ पाहून गावठी बॉम्ब तयार केला. मात्र, तो बॉम्ब निकामी कसा करायचा? हे न समजल्याने तो गोंधळात पडला. त्यामुळे त्याने तो बॉम्ब घेऊन थेट नंदनवन पोलीस ठाणे गाठले. या अजब प्रकाराने नागपूर शहरात खळबळ माजली.

अगोदर नागपुरात काही दिवसांपूर्वी यूटय़ूब पाहून एका मुलाच्या हत्येचा कट आखल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता एका युवकाने यूटय़ूबवर पाहून बॉम्ब तयार केल्याची घटना घडल्याने पोलीस आणि नागरिक चिंतेत पडले.

नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल युवराज पगाडे (वय 25) या युवकाने यूटय़ूबवर बॉम्ब तयार करण्याचा व्हिडीओ बघून एक गावठी बॉम्ब तयार केला. पण, नंतर त्याला तो बॉम्ब निकामी करता न आल्याने तो घाबरला.

नंतर तो बॉम्ब हातात घेऊन त्याने थेट पोलीस ठाण्यात गेला. तरुण हातात बॉम्ब घेऊन आल्याची माहिती मिळताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ माजली.

अखेर पोलिसांनी केला निकामी बॉम्ब :
नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाबा नगर येथील हि घटना आहे. आरोपी राहुलने पोलिसांना बॉम्बची माहिती देताच बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला बोलावले.

पथक आल्यानंतर त्यांनी या गावठी बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट वेगळे करून बॉम्ब निकामी केला अन पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांनी संबंधित प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.