TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 जून 2021 – मुंबईमधील मेट्रोचा आरेतील कारशेड वादग्रस्त ठरल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, येथेही कारशेड उभारणीवरून वाद निर्माण होतोय. ‘या’वरून चेहरा भोळा अन् भानगडी सोळा, अशा शब्दांत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

कांजूरमार्ग येथील जागेवरून वाद निर्माण झाला आहे. न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयात दिलेल्या माहितीचा हवाला देत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

याबाबत ट्विट करत आशिष शेलार म्हणाले, ‘मेट्रो कारशेडच्या कांजूरमार्ग जागेची किंमत बाजारभावाने ३ हजार कोटी द्यायला तयार आहोत, असे आर.ए राजीव यांनी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. आणि सरकार म्हणते, आम्हाला माहिती नाही? मग, एमएमआरडीएवर कुणाचा दबाव? कुठल्या मजल्यावरुन आदेश गेले? अशी बेमालूमपणे बनवाबनवी?,’ असे सवाल आशिष शेलार यांनी केलेत.

‘कारशेड कांजुरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी’. खासगी जमीन मालकांच्या फायद्यासाठीचा हा डाव, आम्ही हे वारंवार सांगतोय.

हळूहळू सत्य समोर येत आहे. जमीन घोटाळ्यावरुन आम्हाला प्रश्न विचारता मग हे काय सुरु आहे? चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!,’ अशी टीका आशिष शेलार यांनी केलीय.

मेट्रो कारशेड आरेमधून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती.

मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा व राजपुत्र करत आहेत, असे त्याच दिवशी आम्ही सांगितले होते,’ असेही शेलार यांनी यापूर्वी म्हटले होते.