मुंबई: तिन्ही पक्षांत धुसफुस सुरु असून सातत्याने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. रोज एकमेकांवर गंभीर आरोप करणं आणि परत सत्तेत राहणं परवडणारं नाही. काँग्रेसने पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेने मुख्य प्रवाहात म्हणजेच भाजपासोबत यावं. अडीच वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री राहावं आणि अडीच वर्ष फडणवीस यांना मुख्यंमंत्री करावं. पुढच्या निवडणुका एकत्रित लढून महाराष्ट्राचं भलं करावं, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याआधी त्यांनी भाजपासोबत आलं पाहिजे असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत अभिनेत्री पायल घोष यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भेट घेतल्यानंतर अंधेरी येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते यांनी शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.