TOD Marathi

अहमदाबाद: ज्या राज्यात दारूबंदी आहे त्या गुजरातमध्येच तब्बल तीन हजार किलोचे ड्रग्ज सापडले आहेत. विशेष म्हणजे, हा ड्रग्ज साठा अफगाणी बनावटीचा असल्याचे समोर आले आहे. गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेलं हिरॉईन (ड्रग्ज) हे तब्बल २० हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातंय.

याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या डायरेक्टोरेट ऑफ रिव्ह्येन्यू इंटेलिजन्सला (DRI) आणि कस्टम विभागाच्या वतीनं १५ सप्टेंबरला करण्यात आली आहे. डायरेक्टोरेट ऑफ रिव्ह्येन्यू इंटेलिजन्सला (DRI) मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी गुजरातमधील कच्छ भागातील मुंद्रा या पोर्टवरुन २९८८ किलो अफगाणी हिरॉईन जप्त केलं. दोन कन्टेनरमधून भरुन आलेल्या या कन्टेनरमधून टॅल्कम पावडर आणण्यात येत आहे अशा प्रकारची कागदपत्रे रंगवण्यात आली होती. हे दोन्ही कन्टेनर अफगाणिस्तानच्या हसन हुसेन लिमिटेड या कंपनीने निर्यात केले असून ते आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील एका कंपनीने मागवल्याची माहिती समोर आली आहे.

मुंद्रा पोर्टच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सध्या गौतम अदानी समुह सांभाळत आहे. हा साठा सापडल्याचे उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावरून अदानी समूहावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. नेटकऱ्यांनी याबाबत अदानी समूहाने स्पष्टीकरण द्यावी अशी मागणी केली आहे.