भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या विद्यमान विधान परिषद सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, माजी मंत्री राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना अशा पाच उमेदवारांची यादी भाजपच्यावतीने घोषित करण्यात आली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपच्या नेत्या, माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांची नाव या यादीत नाहीत. पंकजा मुंडे यांना यावेळी विधान परिषदेची उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता होती, तशा प्रकारचे संकेतही देण्यात आले होते. मिळालेल्या संधीचं सोनं करेन असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होतं.
प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दोन विद्यमान सदस्य आहेत येणाऱ्या काळातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसह विविध ठिकाणी भाजप त्यांना महत्त्वाची भूमिका देऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आले त्याच मतदार संघाचे प्रतिनिधित्व पूर्वी राम शिंदे यांनी केलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा मोठा पराभव रोहित पवारांनी केला होता. महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे तर संघटनेत काम करत असलेले श्रीकांत भारतीय या दोन लोकांना देखील भाजपने संधी दिली आहे.
भाजपची विधानपरिषदेची यादी जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या यादीकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.