टिओडी मराठी, पुणे, दि. 4 सप्टेंबर 2021 – पूनावाला फिनकॉर्प या ‘एनबीएफसी’ वित्तसंस्थेसाठी मुंढव्यामध्ये ४६४ कोटी रुपये किमतीची इमारत खरेदी केली आहे. प्रिस्टीन प्रॉपर्टीजकडून ही इमारत खरेदी केली असून बांधकाम क्षेत्रातला हा अलीकडच्या काळातला पुण्यातला सर्वात मोठा व्यवहार आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदर पूनावाला हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते पूनावाला फिनकॉर्प या कंपनीचेही अध्यक्ष असून त्यांनी कंपनीसाठी या वाणिज्यिक (कमर्शिअल) इमारतीचा खरेदी व्यवहार नुकताच पूर्ण केलाय. याकरिता त्यांनी २७ कोटी ८२ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे.
एपी ८१ टॉवर या १९ मजली व्यावसायिक इमारतीमधील तेरा मजले पूनावाला फिनकॉर्प कंपनीने खरेदी केलेत. याअगोदर कंपनीने याच इमारतीतील पहिला आणि दुसरा मजला खरेदी केला होता. आत्ताच्या खरेदीमुळे या टॉवरची एक पूर्ण विंग आता पूनावाला यांच्या मालकीची झालीय.
प्रिस्टीन प्रॉपर्टीजने सन २०१९ मध्ये एबीआयएल ग्रुपकडून १५० कोटी रुपयांमध्ये येथील ५ एकर जागा खरेदी केली आहे. त्यानंतर अमर बिल्डरशी करार करून येथे १९ मजली इमारत उभारलीय. या १९ मजली टॉवरच्या एका विंगमधील दहा लाख स्क्वेअर फूट सेलेबल एरियातील ६० टक्के भाग पूनावाला यांच्या ताब्यात आहे. तर ३ लाख २० हजार स्क्वेअर फूट कार्पेट ऑफिस एरिया, ३२० कार व ८४९ बाईकसाठी राखीव पार्किंग आहे.