TOD Marathi

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या कॅबिनेटमध्ये (Cabinet Expansion) वर्णी लागली. त्यामुळे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर खांदेपालट होण्याची शक्यता आहे. याआधीच भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांचे नाव भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होते, मात्र आता आणखी एका नेत्याचे नाव चर्चेत आले आहे. विदर्भातील भाजपचा बडा चेहरा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे २०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जामंत्री होते. तेव्हा नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नागपुर जिल्ह्यातील कामठी विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी तीनदा प्रतिनिधित्व केले आहे. २००४, २००९, २०१४ असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत तिकीट दिले नाही, मात्र असं असतानाही संघटनेचा आदेश आपल्यासाठी सर्वोपरी म्हणत काम सुरु ठेवलं. पुढे त्यांना पक्षात सरचिटणीस पद देण्यात आलं, त्या माध्यमातून त्यांनी राज्य पिंजून काढलं.

त्यानंतर नागपूर विधानपरिषद निवडणुकीत बावनकुळेंना स्थान देण्यात आलं. बावनकुळेंनी महाविकास आघाडीच्या उमेवारांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला होता. तूर्तास विधानपरिषदेवरील नेत्यांना भाजपने मंत्रिमंडळातून लांब ठेवले आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित विस्तारात त्यांची वर्णी लागली नाही. परंतु भाजप प्रदेशाध्यक्षपदाची माळ गळ्यात घालत चंद्रशेखर बावनकुळेंचा सन्मान होऊ शकतो.