टिओडी मराठी, दि. 4 जुलै 2021 – कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येमुळे मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. सापते यांनी शनिवारी पहाटे पुण्यातील ताथवडे भागातील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ काढून हे टोकाचे पाऊल आपण का उचलत आहेत? याचं कारण दिलंय. मनोरंजनसृष्टीमध्ये काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य हे आपल्या आत्महत्येला जबाबदार आहेत, असं त्यांनी व्हिडीओत म्हंटलं आहे.
राजू सापते यांनी व्हिडीओत असं म्हंटलं कि, मौर्या हे आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत आहेत, त्यामुळे आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करत आहे. काही दिवसांपासून मला राकेश मौर्य वारंवार पैशावरून त्रास देत आहेत. मी काही कामगारांचे पैसे देणे लागतो, असे सांगून मला त्रास देत होते.
वास्तविक मी सर्वांचे पैसे वेळेवर दिेलेत. पण, असं असूनही हा त्रास देत आहेत. कामगार देत नाहीत. म्हणून मी एक झीचा प्रोजेक्ट सोडलाय. दशमी क्रिएशन्सचे कामही मी करतोय. पण, हा त्रास दिल्यामुळे आता आत्महत्या करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय माझ्यापुढे नाही, असे त्यांनी व्हिडीओत म्हटलं.
‘अगोबाई सूनबाई’, ‘काय घडलं त्या रात्री’, ‘मन्या द वंडर बॉय’, ‘साटंलोटं’, ‘राजधानी एक्स्प्रेस’ आदी चित्रकृतींचे कला दिग्दर्शन राजू सापते यांनी केलंय. राजू सापते हे मनमिळावू कलादिग्दर्शक होते.
मागील 22 वर्षांपासून राजू काम करत आहेत. सध्या लॉकडाऊन काळात राजू सापते यांच्याकडे पाच मालिकांचे काम होतं. परंतु, युनियनच्या दहशतीमुळे त्यातलं एक काम आपण सोडून दिलं होतं, असं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
दोषींवर कठोर कारवाई करावी – राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट आघाडी
कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि क्रीडा आघाडीने या प्रकरणाच्या सखोल चौकशी करावी, अशी मागणी सरकारकडे केलीय.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना एक पत्र लिहिलंय.
ज्या राकेश मौर्या नावाच्या युनियनमधील एका व्यक्तीमुळे राजू यांना आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्याची सखोल चौकशीची मागणी राष्ट्रवादी चित्रपट विभागाने केली आहे.
या प्रकरणातील सर्वच तथ्य शोधून काढण्यासंदर्भात सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहे, असं बाबासाहेब पाटील यांनी ‘सांगितलं आहे.
कला दिग्दर्शक राजू सापतेंच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे शिष्टमंडळ बुधवारी किंवा गुरूवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना मुंबईत भेटणार आहे.
या शिष्टमंडळामध्ये चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, अभिनेत्री प्रिया बेर्डे, सविता मालपेकर, मेघा घाडगे, अभिनेता विजय पाटकर, गिरीश परदेशी, प्रियदर्शन जाधव, गायिका वैशाली माडे यांच्यासह इतर काही अभिनेते-अभिनेत्री आणि कलाकारांचा समावेश असणार आहे.
कुणी त्रास देत असेल तर राष्ट्रवादीच्या चित्रपट विभागाशी संपर्क करावा – बेर्डे
राजू सापतेंच्या आत्महत्या प्रकरणानंतर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. चित्रपट क्षेत्र आणि युनियनमधील कुणी एखाद्याला त्रास देत असेल तर ही बाब राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या लक्षात आणून दयावी, असे आवाहन चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी केलंय. प्रिया बेर्डे ह्या राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष आहेत.
अभिनेत्री सविता मालपेकरांच्या संतप्त भावना
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सविता मालपेकरांनी याबाबत संतप्त भावना व्यक्त केल्यात. राजू सापतेंसारख्या व्यक्तीला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावे लागले, हि खंत त्यांनी व्यक्त केली.
राजू यांनी लढायला हवं होतं, त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलायला नको होतं, अशी हळवी भावना त्यांनी व्यक्त केलीय. हे संपूर्ण प्रकरण राष्ट्रवादी चित्रपट आघाडीच्या माध्यमातून धसास लावणार आहे. सविता मालपेकर या राष्ट्रवादी चित्रपट विभागाच्या प्रदेश सरचिटणीस आहेत.