TOD Marathi

टिओडी मराठी, कोल्हापूर, दि. 4 जुलै 2021 – पश्चिम महाराष्ट्रातून गुजरातला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता पुणे-अहमदाबाद-पुणे या विशेष एक्सप्रेस रेल्वे गाडीचा कोल्हापूरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. शनिवारी दहा जुलैपासून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी ही रेल्वे गाडी कोल्हापूरहून सुटणार आहे. या रेल्वे गाडीमुळे सांगली, कोल्हापूर जिह्यातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची सोय झालीय.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली रेल्वे सेवा आता पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊनमुळे प्रवाशी संख्या घटल्याने आर्थिक फटका बसलेल्या रेल्वे प्रशासनाने काही विशेष आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचा विस्तार करण्याचे धोरण आखले आहे. पुणे-अहमदाबाद-पुणे साप्ताहिक एक्सप्रेसचा कोल्हापूरपर्यंत विस्तार केला आहे.

ही रेल्वे गाडी प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी कोल्हापूरहून (गाडी क्र. 01050) दुपारी 1.15 वाजता सुटणार आहे. हातकणंगले स्थानकावर 1.40 वा, मिरज जंक्शनवर 2.10 वाजता पोहचेल.

त्यानंतर सांगली स्थानकावर 2.25, सातारा स्थानकावर 4.30 वा तर पुणे जंक्शनवर 8.10 वाजता पोहचले. पुणे येथून रवाना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता ही गाडी अहमदाबाद जंक्शवर पोहचणार आहे.

तर, प्रत्येक रविवारी अहमदाबादहून कोल्हापूरकडे येणारी (गाडी क्र. 01049) अहमदाबाद स्थानकावरुन रात्री 8.20 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी 8.50 वाजता पुणे जंक्शनवर पोहचणार आहे.

पुणे येथून रवाना झाल्यानंतर सातारा स्थानकावर 10.50 वाजता, सांगली स्थानकावर दुपारी 12.45 वाजता, हातकणंगले स्थानकावर 1.45 वा आणि त्यानंतर कोल्हापूर स्थानकावर 2.40 वाजता पोहचणार आहे.

या रेल्वे गाडीत एक सेकंड एसी, एसी थ्रि टीयर तीन बोगी, 9 शयनयान आणि सहा सेकंट कोच अशी प्रवाशी बैठक व्यवस्था असणार आहे. या रेल्वे गाडीतून केवळ तिकिट आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.