TOD Marathi

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांचा अर्ज आम्ही मागे घेत आहोत, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्याचबरोबर शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली होती. काही वेळापूर्वीपर्यंत परिस्थिती अशी होती की ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि मुरजी पटेल यांच्यात प्रमुख लढत होईल असच चित्र होतं. मात्र, त्यानंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भाजप आणि मागे घेणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक आता जवळपास बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना या संदर्भात पत्र लिहिलं होतं. रमेश लटके यांनी शाखाप्रमुख ते आमदार म्हणून त्यांनी काम केलं होतं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी जर निवडणूक लढवत असतील तर ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे अशी विनंती करणारं हे पत्र होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील पत्रकार परिषद घेत या संदर्भात आपली भूमिका मांडली होती. त्या पाठोपाठ आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील विधानसभेत आपण रमेश लटके यांच्यासोबत काम केलं आहे, ते आपले सहकारी होते, मित्र होते अशा स्वरूपाचे पत्र एकनाथ शिंदे यांना लिहित रमेश लटके यांच्या निधनानंतर होत असलेली ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली पाहिजे ही मागणी केली होती. आणि आता भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे.