TOD Marathi

टिओडी मराठी, केडगाव, दि. 6 जुलै 2021 – एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज स्वप्निलच्या आई-वडिल यांची त्यांच्या मूळगावी केडगाव (तालुका दौड) येथे जाऊन भेट घेतली. अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे हे सुद्धा आहेत.

यावेळी अमित ठाकरे यांनी ‘ही घटना दुर्दैवी आहे. सरकारने अशा पुन्हा घटना घडू नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. लोणकर कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. भविष्यात एमपीएससी विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही अमित ठाकरे म्हणाले.

याप्रसंगी मनसे नेते राजेंद्र (बाबू) वागसकर, उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, सरचिटणीस किशोर शिंदे, नवी मुबंई शहर अध्यक्ष गजानन काळे,कामगार नेते नरेंद्र तांबोळी, विध्यार्थी सेना शहर अध्यक्ष कल्पेश यादव, बारामती दौड इंदापूर तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते.

स्वप्निल लोणकरने 29 जून रोजी पुण्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहून ‘स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल.

तसेच आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती. स्वप्निलला न्याय देण्याची मागणी करत काल नवी मुंबईत मनसेने शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन देखील केले होते.