TOD Marathi

औरंगाबाद:

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्यासाठी 12 लोकांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor BhagatSingh Koshyari) यांनी त्यावर 2 वर्षे कोणताही निर्णय घेतला नाही. त्यांनतर राज्यात सत्तांतर झालं आणि नवं सरकार आलं. त्यानंतर जुन्या सरकारने दिलेल्या आमदारांच्या यादीचं काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. आता ही यादी मागे घेतल्याचे वृत्त आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Opposition Leader Ambadas Danve) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

राज्यातील मागच्या महाविकास आघाडी सरकारने बारा आमदारांच्या नावांची शिफारस राज्यपाल महोदयांना केली होती, त्याला दोन वर्ष झालेले आहेत. मागच्या वर्षी यासंदर्भात काही मंडळी न्यायालय सुद्धा गेली होती, न्यायालयाने स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. निर्णय घेण्यासंदर्भात आणि न्यायालयाच्या भूमिकेचा कुठेही आदर केलेला नाही असे आढळून येत आहे. जर नवीन नाव दिले जात असेल तर हे राजकारण आहे. एकदा एखाद्या कॅबिनेटने निर्णय दिलेला असेल तो रद्द करणे हे राजकारण आहे.

मुळात नियुक्ती अशी असते की या 12 आमदारांचा राजकीय पक्षाशी काही संबंध नसतो. परंतु नवीन आलेले सरकार यामध्ये राजकारण करू पाहत आहे. याबद्दल आम्ही कोर्टात जाऊ‌ अशी प्रतिक्रीया अंबादास दानवे यांनी दिली आहे.