टिओडी मराठी, दि. 1 जून 2021 – सध्या कोरोनामुळे ‘ऑपरेश लोट्स’ होणार नाही. तसेच शरद पवारांची भेट ही केवळ सर्जरीनंतर त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी घेतली होती, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय.
देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. रावेर तालुक्यातील तांदळवाडी इथं पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.
सध्या कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्यात कोणतेही राजकीय बदल होणार नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करता सध्या ‘ऑपरेशन लोट्स’ होणार नाही, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शरद पवार यांनी त्यांच्या सिलव्हर ओक या बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली होती. यानंतर अनेक राजकीय तर्क वितर्क लावले जात होते. पण, देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतही स्पष्टीकरण दिलंय. शरद पवार हे राजकीय किंवा वैचारिक विरोधक असले तरी ते राज्यातील ज्येष्ठ नेतेही आहेत. पवारांची भेट ही केवळ सर्जरीनंतर त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी घेतली होती, असं फडणवीस म्हणाले.
जळगाव दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यात यंदाही नुकसान झालंय. कोकणात ज्याप्रमाणे नुकसान झाल्यानं आर्थिक मदत महाराष्ट्र सरकारने केलीय, त्या धर्तीवर आम्हाला तातडीची मदत हवी आहे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, असे फडणवीस म्हणाले.