TOD Marathi

UP मध्ये प्रशासन ढासळले !; 74 माजी पोलीस अन सनदी अधिकाऱ्यांचे खुले पत्र, सांगितले राज्यातील वास्तव

टिओडी मराठी, लखनौ, दि. 12 जुलै 2021 – उत्तर प्रदेशात योगी सरकारच्या राजवटीमध्ये अत्यंत भीषण स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासन पूर्ण ढासळले आहे. राज्यामध्ये अराजकता माजली आहे, अशी जाहीर टीका उत्तर प्रदेशातील सुमारे 200 प्रतिष्ठित व्यक्‍तींनी खुल्या पत्राद्वारे केलीय. त्या दोनशे जणांत 74 जण माजी आयपीएस किंवा आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांनी या खुल्या पत्राद्वारे व्यक्‍त केलेल्या भावनांना महत्त्व दिलं जात आहे.

सरकार विरोधकांची सर्रास धरपकड करून त्यांचा कोठडीमध्ये छळ करत आहे. लव्ह जिहादच्या नावाखाली मुस्लिमांवर हल्ले केले जात आहेत.

गोहत्येच्या आरोपाखाली अनेकांना रासुका लावला जातोय.राज्यातील ही स्थिती अराजकतासारखीच आहे, असे या पत्रात नमूद केले आहे.

योगी सरकारने अत्यंत बेफिकिरीने कोविड स्थिती हाताळल्याची टीकाही यात केली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे.

कोविडच्या साथीत असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. अशा मृतांची मोजदाद केलेली नाही, असा ठपकाही या पत्रातून ठेवला आहे.

या राज्यातील प्रशासन दररोज कायदा आणि घटनेच्या मूल्यांपासून दूर जात आहे. या प्रकारांना आत्ताच आळा घातला नाही, तर राज्यातील लोकशाही आणि लोकशाही संस्थांचे पूर्ण खच्चीकरण होणार आहे, अशी भीती देखील यातून व्यक्‍त केली आहे. या पत्रात राज्यात ज्या लोकांचा अमानुष छळ झाला आहे, त्याचा आकडेवारीसह तपशील सादर केला आहे.