TOD Marathi

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंत शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचं येणाऱ्या काळातील नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Shivsena) यांची प्रतिमा तयार व्हावी, या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात होताना दिसत आहे. हे होत असताना आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे कार्याध्यक्षपद देण्यात यावे, अशी मागणी पक्षातून केली जात आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray Yuvasena) यांच्याकडे युवा सेनेची धुरा देण्याची मागणी केली जात आहे.

युवासेना ही शिवसेनेची यंग ब्रिगेड आहे. त्यामुळे तेजस ठाकरेंनाही राजकारणात जम बसवण्याआधी बेस तयार करावा लागेल आणि हा बेस तयार करण्यासाठी युवासेनेची धुरा तेजस यांच्या खांद्यावर सोपवण्याची मागणी केली जात आहे. तर आदित्य ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर शिवसेने नेतेपदानंतर आता थेट कार्याध्यक्षपद सुपूर्द करण्याचीही इच्छा व्यक्त केली जात आहे.

तेजस ठाकरे यांच्याभोवती ‘ब्रँड ठाकरे’चं वलय आहे, स्वाभाविकच शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण आहे. त्यामुळे आता शिवसेना संकटातून जात असताना तेजस ठाकरे सक्रिय होणे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते. यापूर्वीही अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही. आजवर तेजस ठाकरे हे तसे राजकारणापासून दूर राहिल्याचे दिसून आले. परंतु, आता शिवसेनेचे मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करू शकतात, असंही म्हटलं जात आहे.