राज्यात एकामागून एक निवडणुकांचं सत्र सध्या सुरू आहे. नुकताच राज्यसभा निवडणुका पार पडल्या असून येत्या 20 तारखेला विधान परिषदेसाठी निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून परतताच भाजपाने तातडीची बैठक घेतली होती. (Maharashtra MLC Election 2022)
विधानपरिषदेची जबाबदारी अशिष शेलार आणि गिरीश महाजन यांच्यावर सोपवून फडणवीस स्वत:ही यासाठी तयारीला लागले आहेत. संख्याबळ कमी असतानाही भाजपने पाचवा उमेदवार दिलेला आहे. मात्र याचप्रकारे याआधी धनंजय महाडिकांना निवडून आणून भाजपने तिन्ही पक्षांना शह दिला आहे.
राज्यसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या बहुजन विकास आघाडीच्या मतांचा कौल यंदा कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्याकडे तीन मतं असल्याने राज्यसभेसाठी देखील त्यांची मनधरणी भाजप आणि महाविकास आघाडी दोघांकडूनही करण्यात आली होती. मात्र मतदानाला केवळ चार दिवस बाकी असताना ठाकूर अचानक न्यूयॉर्कला दाखल झाले आहेत.
बविआकडे स्वत:ची तीन मतं आहेत. ही मतं ज्यांना मिळतील त्यांचा विजय सुकर मानला जातोय. पण आता त्यांच्या तीनपैकी एका मताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. कारण आघाडीतील नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर अचानक न्युयॉर्कला गेले आहेत. विधान परिषदेची निवडणूक 20 तारखेला आहे. त्यामुळे तोपर्यंत ते परतणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
आमदार क्षितीज ठाकूर देशाबाहेर गेल्याने एका मताचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी हितेंद्र ठाकूर यांनी शेवटपर्यंत सगळे पत्ते झाकून ठेवले होते. त्यांनी माध्यमांशीही चर्ची केली नाही. हाच सस्पेन्स याहीवेळी कायम ठेवण्यासाठी ही ठाकूर यांची खेळी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनीही ठाकूर कुटुंबीयांची भेट घेतली होती.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, आमदार सुनील राऊत यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर गिरीश महाजन यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. हितेंद्र ठाकूर यांनी मात्र आपल्या मतदानाबद्दल मुक्त भाष्य केलं नव्हतं. आम्ही ज्यांना मतं देऊ त्यांचा विजय होईल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं.
राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही छोट्या पक्षांसह, अपक्षांच्या मताला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आणि या पार्श्वभूमीवर क्षितिज ठाकूर हे न्यूयॉर्कला दाखल झाले आहेत.