TOD Marathi

नवी दिल्ली :
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरूवारी कोरोनाची लागण झाली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी यांच्या काँग्रेस नेत्यांसोबत बैठका सुरू होत्या. दरम्यान, सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सोनिया गांधी लवकरात लवकर बऱ्या व्हावात यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी कोविड-19 मधून बऱ्या व्हाव्यात, लवकरच त्यांनी कोरोनावर मात करावी अशा शुभेच्छा मी त्यांना देतो” असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी स्वत: ला आयसोलेट केली असल्याची माहिती आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येताच बैठकीला हजर असलेल्या कॉंग्रेस नेत्यांचंही टेन्शन वाढलं आहे.

बुधवारी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावली आहे. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सोनिया गांधींना 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पण आता सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांची चौकशी होणार की नाही? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.