नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आल्यानंतर केंद्र सरकार आता मनीष सिसोदियांनाही अटक करणार आहे. यासाठी सरकारने अधिकाऱ्यांना खोटे प्रकरण तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.
पत्रकार परिषद घेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारच्या विकास कामांचे देशभरच नव्हे तर जागतिक पातळीवरही कौतूक होत आहे. मात्र केंद्रातील मोदी सरकार देशात अशांतता निर्माण करण्यासंदर्भात प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांचा कल आपकडे वाढल्याचे नुकत्याच झालेल्या विविध निवडणुकीतून दिसून येत आहे.
त्यामुळे या विकास कामांना थांबविण्यासाठी केंद्र सरकार आमच्या मंत्र्यांवर खोटे केसेस दाखल करुन त्यांना अटक करण्याच्या प्रयत्नात आहे. केंद्र सरकारने तपास यंत्रणांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात मनिष सिसोदिया यांना गोवण्याच्या सूचना केल्या आहे. पुढील काही दिवसांतच त्यांना अटक होणार असल्याचंही केजरीवाल यांनी यावेळेस सांगितलं.
दरम्यान आम्हाला अटक होण्याची भिती नाही आहे. मात्र नागरिकांनी ज्या विश्वासाने विकासासाठी आम्हाला मत दिले त्यांचे काम करण्यापासून आम्हाला अडवू नका असा टोलाही केजरीवाल यांनी लागावला आहे.