मुंबई : संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न होता. अधिक पैसा खर्च करु शकतो, घोडेबाजार करु शकतो अशा पट्ट्यातून उमेदवार देण्यात आला आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ( Sanjay Raut )
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा आमच्याकडे असून दोन्ही उमेदवार जिंकतील असा विश्वास व्यक्त केला. “महाविकास आघाडीचे आणखी दोन उमेदवारही (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) विजयी होतील. अशाप्रकारे आमचे चार उमेदवार जिंकतील.
तसेच काँग्रेसने त्यांचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना देशभरातून जिथे जिथे सोय करता येईल तिथे सोय लावली आहे. स्थानिक उमेदवार दिला असता तर काँग्रेसला अधिक बळकटी मिळाली असती. पण कदाचित त्यांनी राष्ट्रीय स्तराचा, इतर राज्यांचा विचार केलेला दिसत आहे. संसदेत भाजपा सरकारला प्रत्युत्तर देणारी चांगली लोकं त्यांच्या नजरेत असू शकतात. कोणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर शिवसेनेनं बोलणं योग्य नाही, असंही राऊत यावेळेस बोलताना म्हणाले.