मुंबई : आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जायचं आहे. महाराष्ट्र शासनानेदेखील या निर्णयाला संमती दिली आहे. आता यापुढे राज्यात ऑफलाईन परीक्षाच होणार आहेत, अशी माहिती उच्च-तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
सामंत म्हणाले की, ऑफलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली आहे. आपण अभ्यास कितपत करू शकतो असा विद्यार्थांच्या मनात न्यूनगंड होता. त्यामुळे त्यांना परीक्षेआधी प्रश्नावली देण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. 12 वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची असते. त्यामुळे ते 12 वीच्या अभ्यासाक्रमाकडे दुर्लक्ष करून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात.
म्हणून या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीपासून आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेत आहोत. याआधी पृथ्वीराज चव्हाण असताना हा प्रयोग झालेला होता. आता हा प्रयोग पुन्हा करणार आहोत. मेरीटसाठी 12 वी आणि सीईटीचे 50 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढच्या वर्षीपासून सीईटी आणि 12 वीच्या गुणांना महत्त्व देण्यात येणार आहे, असंही सामंत यावेळेस बोलताना म्हणाले.