TOD Marathi

मुंबई :

केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली आहे. आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपयांनी कमी करीत आहोत. यामुळे पेट्रोल ९.५ रुपये तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.याशिवाय, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलेंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल.

 

१२ ट्विट करत अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादनांवरील अबकारी, कस्टम, आयात आणि निर्यात शुल्क कमी करण्याबाबत माहिती दिली आहे. “आमची आयात अवलंबित्व जास्त असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी आम्ही कच्चा माल आणि मध्यस्थांवर सीमाशुल्क देखील कमी करत आहोत. यामुळे अंतिम उत्पादनांची किंमत कमी होईल. त्याचप्रमाणे आम्ही कच्चा माल आणि मध्यस्थ यांच्या किंमती कमी करण्यासाठी लोखंड आणि पोलाद यांच्यावरील सीमाशुल्क कमी करत आहोत. काही स्टील कच्च्या मालावरील आयात शुल्क कमी केले जाईल. मात्र, काही पोलाद उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारण्यात येणार आहे,” असे निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे.

 

गेले काही दिवस पेट्रोल-डिझेलच्या भावांमध्ये सतत होणारी दरवाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी अडचणीची बाब ठरत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळणार आहे