TOD Marathi

पुण्यातील लाल महालात झालेल्या चित्रीकरण प्रकरणी आता खासदार उदयनराजे भोसले यांनी वक्तव्य केलंय. लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही मात्र या ठिकाणी ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगांशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलेले आहे. लाल महाल या वास्तूचा इतिहास लक्षात घेऊन चित्रीकरण करणे गरजेचे आहे. केवळ व्यावसायिक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराच खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.  प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांनी आपले सविस्तर भूमिका मांडलेली आहे.
काय म्हणाले उदयनराजे भोसले…
ऐतिहासिक लालमहालात नाच-गाण्यांचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा.
लालमहाल ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळे लालमहाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, लालमहाल हि वास्तू सिनेमातील नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाही. याच संबधितानी भान ठेवायला हवं होत. मात्र या वास्तूत एका सिनेमाचे चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानी कोणी हे चित्रीकरण केले असेल, त्यांनी ते चित्रीकरण सिनेमात वापरू नये. त्यांनी ते तात्काळ थांबवावे. तसेच हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकाऱ्यानी परवानगी दिली. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी.
खरं तर लालमहाल हि वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाही. मात्र या ठिकाणी कोणतही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणे गरजेचं आहे. केवळ व्यावसायीक हेतूने कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसानी कडक कारवाई करावी.
मुळात ही वास्तू पुणे महानगर पालिकेच्या ताब्यात असून या चित्रिकरणासाठी महापालिकेची रितसर परवानगी घेतली आहे का? महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली? तसेच जर परवानगी दिली असेल कर कोणत्या अटी व शर्तींवर परवानगी दिली? याची चौकशी झाली पाहिजे. याच वास्तूत चित्रीकरण करण्याचा नेमका हेतू काय आहे? त्याचबरोबर जे चित्रिकरण झाले असेल ते तपासून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी.

तर पुण्यातील लाल महाल येथे चित्रीकरण करण्यात आलेल्या प्रकरणावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी ही भूमिका मांडलेली आहे.