नागपुर: गोंदिया – भंडारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद काही थांबताना दिसत नाही आहे. आता हा वाद काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याची तक्रार थेट सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. येत्या काळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांवर या गोष्टीचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. भंडारा जिल्हा परिषदेतही राष्ट्रवादी आणि भाजपसोबत जाणार होते मात्र पक्ष आणि भाजपच्या नाराज गटाला सोबत घेत नाना पटोले यांनी भंडारा जिल्हा परिषद काँग्रेसकडे कायम ठेवली. याच विषयावर व्यक्त होत असताना नाना पटोले यांनी ‘राष्ट्रवादी’ने पाठीत खंजीर खुपसला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. नाना पटोले यांची प्रतिक्रिया येताच राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांच्या राजकीय पार्श्वभूमीचा मुद्दा पुढे आणत केवळ ‘हेडलाईन’साठी पटोले असे वक्तव्य करीत असल्याचा आरोप केला होता. आपल्या वक्तव्याचे परिणाम काय होतील याचा विचार करून बोललं पाहिजे असे देखील अजित पवार म्हणाले होते. त्यावर पटोले यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून देऊन पवार यांचीही पार्श्वभूमी निदर्शनास आणून दिली होती.
नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार केली. नागपुरात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी याबाबत माहिती दिली.