नवी दिल्ली : राज्यसभेसाठी पंधरा राज्यातील ५७ जागांसाठी निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं सविस्तर वेळापत्रक जारी केलं आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश आहे. येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी आकड्यांच्या दृष्टीने जून महिन्यात होणारी राज्य सभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या सहा खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे.
राज्यसभेची मुदत संपत असलेले राज्यातील खासदार
१. पियुष गोयल
२. पी. चिदंबरम
३. प्रफुल पटेल
४. विकास महात्मे
५. संजय राऊत
६. विनय सहस्त्रबुद्धे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफु्ल्ल पटेल, शिवसेना नेते संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता आहे तर पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांचही पुन्हा येणं निश्चित मानलं जातं. महाराष्ट्रातील भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत. कालच पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील राज्यसभा अपक्ष लढवणार असल्याचं घोषित केलं, राज्यसभेतील ६ जागांचं गणित देखील त्यांनी सांगितलं होतं. या सर्व पार्श्वभुमीवर आता राज्यसभेच्या निवडणुकीबद्दल देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.