औरंगाबाद: औरंगाबाद येथील रहिवासी दिलीप लुनावत यांच्या मुलीचा कोव्हिशिल्ड लसीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दिलीप यांची मुलगी स्नेहल ही नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. २८ जानेवारी २०२१ रोजी तिने कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. मात्र त्याच्या दुष्परिणामांमुळे १ मार्च २०२१ रोजी तिचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या याचिकेत म्हटले आहे, भारतीय औषध महानियंत्रक, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संचालक, केंद्र व राज्य सरकारने कोरोनावरील लस सुरक्षित असल्याचे खोटे आश्वासन दिले.
माझ्या मुलीसारख्या अनेक आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना बळजबरी लस घेण्यास भाग पाडले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मृत्यू कोविशिल्डच्या दुष्परिणामांमुळे झाला, हे शासनालाही मान्य असल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे.आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बेफिकीर सरकारी यंत्रणांकडून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचे लुनावत यांनी सांगितले. यासाठी त्यांनी एक हजार कोटी रुपयांची भरपाई मिळण्याची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी केली आहे.