पुणे : एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या वाढत्या रूग्णसंख्येने देशाची चिंता वाढवली आहे. त्यात पुण्यामध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले 80 टक्के लोक करोनाबाधित आढळत आहेत, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. नुकतीच पुणे महापालिकेची करोना आढावा बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मोहोळ बोलत होते. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंता करण्याचे कारण जरी नसले तरी, आधीच्या निर्बंधांची अधिक सक्तीने अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुण्यातील रूग्णसंख्या एका आठवड्यात चौपट झाल्याचेदेखील यावेळी स्पष्ट केले.
मोहोळ म्हणाले की, आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे दिसून येत नसून ओमिक्रोनच्या रुग्णांमध्येदेखील अगदी सौम्य लक्षणे दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील 3 लाख लोकांनी 84 दिवस उलटूनही दुसरा डोस घेतला नसून अशा नागरिकांपर्यंत महापालिका पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. मास्क तसेच नियमांच्या अंमलबजावणीसाठी भरारी पथके तयार करण्यात येणार असून 10 जानेवारी पासून फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेल्या रुग्णांना बूस्टर डोस दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महापौर मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणालेत, पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवर गेली. त्यापैकी 75 ते 80 टक्के रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. शहरातील 2500 रूग्णांपैकी 300 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 80 रुग्ण ऑक्सिजनवर आणि 25 रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणेमहापालिकेकडे मुबलक प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध आहे. 1800 बेड्स , 4000 रेमडिसिव्हिर तसेच पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
वाढत्या रूग्णसंख्येमुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नसून यापूर्वीच्या निर्बंधांची अधिक सक्तीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आल्याचे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.